लेखिकेचे मनोगत

लोकांची बहुतेक वेळा अशी कल्पना असते की शास्त्रीय संशोधक हे नेहमी त्यांच्यात्यांच्या संशोधन विषयात गढून गेलेले असतात. पण मला मात्र माझ्या संशोधनाव्यतिरिक्तही बर्‍याच विषयांमध्ये रस आहे. अगदी भाषाशास्त्रापासून खगोलशास्त्रापर्यंत. माझा ब्लॉग लिहीण्यासाठी मात्र मी या अनेक विषयांपैकी विज्ञान आणि पर्यावरण (त्याची आपण केलेली हानी व ती थांबविण्याचे प्रयत्न) या दोन अतिशय आवडीच्या विषयांची निवड केली आहे. आणि त्यातील पठडीबाहेरच्या, औत्सुक्यपूर्ण घडामोडी व त्यांबाबतचे माझे विचार मी माझ्या वाचकांसमोर मांडत असते. एका सच्च्या संशोधकाप्रमाणे मी सर्व माहितीकडे निःपक्षपाती व तर्कसुसंगत दृष्टीने बघते. एखाद्या घटनेचे किंवा निरीक्षणाचे  सध्या उपलब्ध असलेल्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावर स्पष्टीकरण देता येत नसेलही आपल्याला. पण म्हणून ती घटनाच खोटी ठरवणे किंवा ते निरीक्षण चुकीचे आहे असे म्हणणे मला योग्य वाटत नाही.

आपल्याला या पृथ्वीवर शिकण्यासारखे आणि समजवून घेण्यासारखे बरेच काही शिल्लक आहे. जीवन हे नेहमी चक्राकार रीतीने प्रगत होते असेही माझे मत आहे. आणि म्हणूनच आपल्याआधी पृथ्वीवर प्रगत मानव झालाच नाही असे मी तरी मानत नाही. इतिहासात (ज्याला आपण सोयिस्कररित्या "दंतकथा" म्हणून दुर्लक्ष करतो) अनेक प्रगत संस्कृती, त्यांच्या प्रगतीच्या पाऊलखुणा, त्यांची (सावकाश किंवा अचानक) अधोगती याची कितीतरी उदाहरणे सापडतात. आपल्या भविष्याविषयी आणि पृथ्वीविषयी आपण भूतकाळापासून बरच काही शिकू शकतो, फक्त आपण तसे ठरवायला हवे.



हल्लीच झालेल्या social media क्रांतीचा आणि अद्ययावत web2.0 चा उपयोग मला विज्ञान, पर्यावरण व मानवतावादी प्रयत्न यांच्याविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी करायचा आहे. माझ्या बरोबरच्या पृथ्वीवासियांसोबत मला जगात काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे.

गेल्या वर्षभरापासून मला अध्यात्माविषयीही औत्सुक्य आणि आवड निर्माण झाली आहे. आयुष्यातील काही घटनांमुळे माझा कल अध्यात्म आणि तत्वज्ञान याकडे झुकला. आणि काही पुस्तके, चित्रपट आणि व्यक्ती यांच्या मदतीने आजची मी ही दोनेक वर्षांपूर्वीपेक्षा खूप वेगळी व्यक्ती आहे आणि ती प्रक्रिया आयुष्यभर चालूच रहाणार आहे. पण हे घडून आले याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. शिवाय त्यातून मला विज्ञान आणि अध्यात्म यातील संबंध हा संशोधन व अभ्याससाठी नवीन विषयही मिळाला आहे.

धन्यवाद,

राधिका