११ जुलै, २०१०

नस्ती उठाठेव?

नाही, माझ्या मते तरी हा ब्लॉग ही नस्ती उठाठेव नाही. आणि ती तशी का नाही हे तुम्हाला सांगण्याचा या पहिल्या ब्लॉगपोस्टचा उद्देश आहे. मी सप्टेंबर 2008 मध्ये सुरू केलेल्या माझ्या पहिल्यावहिल्या ब्लॉगवर मी आजपर्यंत 240 पेक्षा जास्त ब्लॉगपोस्ट लिहीले आहेत आणि अजूनही लिहिते आहे. त्या ब्लॉगचे नाव मी watchful eyes, thoughtful mind (वॉचफुल आइज, थॉटफुल माइंड = जागरूक डोळे, विचारी मन) असे ठेवले. कारण या जगात (विषेशतः विज्ञान, पर्यावरण व मानवतावाद यांच्या जगात) होणार्‍या पठडीबाहेरील, केवळ मनोरंजकच नव्हे तर उपयुक्त व विचार करायला लावतील अशा घडामोडी माझ्या वाचकांसमोर ठेवणे हा माझा उद्देश होता. तसेच त्यांविषयीचे माझे विचारही मांडण्याची मला ही एक उत्तम संधी होती. इंटरनेटच्या महाजालातून नेमकी अशी माहिती, अशा बातम्या शोधण्यासाठी जागरूक तर रहावेच लागते. आणि मग मांडण्यासाठी विचार असायला मनही विचारी हवे. म्हणून या नावाचे प्रयोजन!

मी तो ब्लॉग सुरू केला केवळ हौस म्हणून. मी तो किती दिवस लिहीत राहीन याबद्दल मला शंकाच होती. पण जसा वेळ गेला तशी माझी लिखाणाची आवड वाढतच गेली. किंबहुना परत आली म्हणायला हरकत नाही. मी मुळात मराठी माध्यमातून शिकले असले तरी अकरावी नंतर उच्चशिक्षण पूर्ण होईपर्यंत मी इंग्रजीतच लिखाण करत आले. त्यामुळे मग ब्लॉग सुरू केला तो ही इंग्रजीतच. मी ज्या विषयांवर लिहीते त्यातील विज्ञान, त्यातील प्रगती आणि विषेशतः त्याचे आपल्या दैनिक जीवनातील स्थान याविषयी सामान्य लोकांसाठी बरेच कमी लिहीले जाते याची मला मनापासून खंत वाटते. आणि मराठीमध्ये तर हे प्रमाण खूपच कमी आहे. पर्यावरण, त्याची आपण केलेली वाताहत आणि त्यावरचे उपाय याविषयी आजकाल सर्वच भाषांमध्ये बरेच लिहीले जाते. आणि त्याची गरजही आहे. आपल्यातीलच काही सामान्य लोक काही असामान्य मानवतावादी कामे करीत आहेत ती संपूर्ण जगापर्यंत पोहोचवून इतरांना स्फूर्ती देण्याचे काम करणे हे माझ्या ब्लॉगचे आणखी एक उद्दिष्ट.

मग हल्लीच माझ्या मनात विचार आला की हे सगळे ज्ञान, ही महत्त्वाची माहिती मी इंग्रजी वाचता येणार्‍यांना उपलब्ध करून देते तर मग मराठी येणार्‍यांसाठी का नाही? आणि मग त्यातूनच जन्म झाला ‘सांगण्यासारखे काही’चा. मी watchful eyes, thoughtful mind मधील सगळेच ब्लॉगपोस्ट इथे भाषांतरित करून लिहिणार नाही. त्याचबरोबर काही नवीन लेखही मी लिहीन जे आजच्या घडामोडींवर आधारित असतील. या ब्लॉगपोस्टची क्रमवारता watchful eyes, thoughtful mind सारखी असण्याची शक्यताही कमी. थोडक्यात म्हणजे त्या दिवशी मला तुम्हाला जे सांगण्यासारखे वाटेल ते तुम्हाला इथे दिसेल. म्हणजेच हा ब्लॉग ही केवळ watchful eyes, thoughtful mind ची मराठी प्रतिमा नसून तो एक स्वतंत्र ब्लॉग म्हणायला हरकत नाही. तेव्हा आता ‘सांगण्यासारखे काही’ वरच्या लेखांसाठी तुमचे जागरूक डोळे आणि विचारी मन उत्सुक असेल अशी अपेक्षा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: