१८ जुलै, २०१०

गोष्ट एका गोष्टीची

मोर्स कोड या सांकेतिक भाषेमध्ये ... --- ... (तीन टिंब, तीन रेघा, तीन टिंब) याचा अर्थ SOS (Save Our Souls = सेव्ह अवर सोल्स्) म्हणजेच ‘आमचे प्राण वाचवा’ असा होतो. आणि सहाजिकच हा सांकेतिक संदेश अतिशय गंभीर संकटात सापडलेले लोक पाठवतात ज्यांना अतिशय जलद मदतीची नितांत गरज आहे. आज मी ज्या SoS बद्दल लिहिणार आहे ती सुद्धा एक मदतीची हाक आहे पण सगळ्या जगासाठी. Story of Stuff (स्टोरी ऑफ स्टफ = वस्तुंची गोष्ट) हा ऑनलाइन उपलब्ध असलेला, अॅनी लिओनार्ड हिने तयार केलेला माहितीपट आहे. आपण वापरतो त्या वस्तू (goods) व आपल्याला उपलब्ध असलेल्या विविध सेवा (services) यांच्या बाबतीतील सुरुवातीपासून शेवटापर्यंत घडणार्‍या वेगवेगळ्या प्रक्रियांविषयी अॅनीने 10 वर्षांपेक्षा जास्त काळ संशोधन केले. ती त्यासाठी जगभर फिरली. आणि या अथक परिश्रमांतून तयार झालेला माहितीपट 'स्टोरी ऑफ स्टफ' 4 डिसेंबर 2007 रोजी इंटरनेटवर सर्वांना पहाण्यासाठी मोफत उपलब्ध झाला.

त्यांच्या वेबसाईटवर म्हटल्याप्रमाणे, “आपण वापरत असलेल्या वस्तुंचे उत्पादन, वापर व विल्हेवाटीचा आपल्या समाजावर सतत परिणाम होत असतो. आणि तरीही यातील बहुतेक गोष्टी आपल्याला माहितच नसतात. स्टोरी ऑफ स्टफ तुम्हाला 20 मिनिटांत  उत्पादन व वापराच्या आपल्या सवयींविषयी सत्याधारित आणि मनोरंजक माहिती देतो. अनेक सामाजिक व पर्यावरणाशी संबंधित असलेल्या प्रश्नांमधील दुवा दाखवत हा माहितीपट आपल्याला एकत्रितपणे त्यांवर उपाय शोधण्याचे आवाहन करतो. हा माहितीपट तुम्हाला काहीतरी शिकवेल, तुम्हाला हसवेल, आणि कदाचित तुमच्या जीवनातील सर्व वस्तूंकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोनच बदलून टाकेल.” निदान मी तरी त्यापासून बरेच काही शिकले. मी स्वतःला लावलेल्या काही सवयींचा पर्यावरणावर खरेच चांगला परिणाम होतो हे कळल्याने मला बरेही वाटले.

स्टोरी ऑफ स्टफ हा जरी मुख्यत्वेकरून अमेरिकेतील ऐहिकतावादी व चंगळवादी जीवनमानावर आधारलेला असला तरी इतरांनाही त्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. कारण इतर देशही जगण्याच्या संकल्पनेच्या बाबतीत अमेरिकनांचीच री ओढताना दिसतात. या माहितीपटाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे अॅनीने वापरलेली साधी सोपी भाषा व समजण्यास सोपी अॅनिमेशन्स्. यामुळे हा माहितीपट आपल्याला काय सांगतो आहे हे अगदी माझ्यासारख्या वाणिज्यशास्त्र, अर्थशास्त्र किंवा जागतिक राजकारण यापैकी कशातही गती नसलेल्या व्यक्तीलादेखील सहजपणे कळते. आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व “वस्तुंची गोष्ट” 20 मिनिटांत आपल्याला सांगण्यात हा माहितीपट नक्कीच यशस्वी होतो. उत्पादनासाठी निसर्गाची लूट – उत्पादन – वाटप – वापर – विल्हेवाट हे चक्र आपल्या नकळत आपल्या आयुष्याचे सार बनले आहे. आणि या (दुष्ट)चक्रातील हानीकारक बारकावे हा माहितीपट आपल्या लक्षात आणून देतो. पृथ्वीवरील नैसर्गिक साधनांच्या उदंड खजिन्यापैकी एक तृतीयांश आपण केवळ गेल्या दशकातच कसा वापरला, या अतिवापरामुळे तिथल्या निसर्गाच्या सान्निध्यात जगणार्‍या रहिवाशांना शहरात कसे यावे लागते, तिथे ते (व आपण) वस्तुंच्या उत्पादनात वापरल्या जाणार्‍या विविध रसायनांना व विषारी पदार्थांना कसे बळी पडतात, आपल्याला स्वस्तात मिळणार्‍या वस्तूच्या किमतीची भरपाई व्यापारी बाह्य साधनांमधून (externalizing the cost) कशी करून घेतात, सर्वच माल हा काही दिवसांनी टाकाऊ होइल अशा रितीनेच कसा उत्पादित होतो, 99% वस्तू उत्पादनापासून 6 महिन्यात ‘लॅंड्फिल’ म्हणून जमिनीत कशा गाडल्या जातात, अशी अनेक धक्कादायक (किंवा केवळ दुर्लक्षिलेली) सत्य विधाने स्टोरी ऑफ स्टफ आपल्यासमोर मांडतो.

या माहितीपटाबद्दल व त्यापासून मी काय शिकले याबद्दल मला बरेच काही लिहीता येईल. पण मी केवळ काही महत्त्वाचे मुद्दे इथे मांडून तो माहितीपट तुम्ही प्रत्यक्षच पहा असे मी सुचविणार आहे.

• आईचे दूध हे नवजात जिवाला मिळणारे पहिले अन्न. त्यामुळे त्यातून त्याला जीवनाला चांगली सुरुवात करण्यासाठी पौष्टिक सत्व मिळावे अशी अपेक्षा. पण आजच्या काळात, आईच्या शरीरात विविध मार्गांनी गेलेल्या विषारी व हानिकारक पदार्थांमुळे, तिचे दूध हे त्या नवजात जिवाला मिळणारे सर्वात हानिकारक अन्नही ठरू शकते. मानवी मातांकडे निदान तयार दुधाचा (formula milk) पर्याय आहे. पण पृथ्वीवरील इतर सजीव व त्यांच्या पिलांचे काय? जे हानिकारक पदार्थ त्यांनी तयारही केले नाहीत त्यांचे दुष्परिणाम मात्र त्यांना भोगावे लागत आहेत!

• रेडिओशॅक या विद्युत उपकरणांच्या अमेरिकन दुकानात केवळ $4.95ला मिळणार्‍या रेडिओविषयी अॅनीचे विधान मला फार मार्मिक वाटले. ती म्हणते, “या रेडिओची पूर्ण किंमत मी कुठे दिलिये? ती भरली आहे कॉंगोच्या खोर्‍यातील मुलांनी ... आपले भविष्य देऊन.”

• काही गोष्टिंची आपल्याला इतकी सवय होते की जेव्हा त्यांतील भयंकरपणा लक्षात आणून दिला जातो तेव्हा तो खूप धक्कादायक वाटतो. स्टोरी ऑफ स्टफ आपल्याला सर्व वस्तू या कचरापेटीत जाण्यासाठीच कशा बनवल्या जातात (designed for dumps) हे सांगतो. हे दोन प्रकारे घडते. Planned obsolescence (ठरवून अप्रचलीत करणे, जसे कॉंप्युटरचे CPU हे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात जेणेकरून आदल्या वर्षीच्या CPU मधील चिप या वर्षीच्या CPUमध्ये बसत नाही. म्हणजे संपूर्ण CPUच नवीन घेणे भाग पडते) आणि Perceived obsolescence (अप्रचलीत आहे असे लोकांना वाटायला लावणे, जशी स्त्रियांच्या पादत्राणाच्या टाचांची (heels) रुंदी दरवर्षी जाड – बारीक – जाड – बारीक अशी बदलत रहाते. म्हणजे अद्ययावत फॅशन करायची असेल तर दरवर्षी नवीन विकत घ्या).

असे बरेचसे धक्कादायक आणि खेदजनक ज्ञान हा माहितीपट आपल्याला 20 मिनिटांत देऊन जातो. आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या आयुष्याची 20 मिनिटे तुम्ही नक्कीच द्याल, नाही का? तर मग स्टोरी ऑफ स्टफ जरूर पहा, त्यांच्या माहितीसमृद्ध संकेतस्थळाला भेट द्या आणि आपले भविष्य आपल्या वर्तमानापेक्षा वेगळे व्हावे यासाठी आपण काय करू शकतो ते आवर्जून जाणून घ्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: