१ सप्टेंबरच्या लोकसत्ता मुंबई वृत्तांतमध्ये एक बातमी वाचनात आली आणि आपल्या ब्लॉगवर त्याबद्दल लिहून आणखी बर्याच लोकांना त्याची माहिती करून द्यावी असे वाटले. मराठी भाषा, व पर्यायाने मराठी भाषिक लोक, दर्जेदार साहित्यनिर्मितीच्या बाबतीत केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगभरातही नावाजलेले आहेत. महाविद्यालयातील मराठी वाङमय मंडळे आणि परदेशातील शहराशहरात असलेली मराठी मंडळे ही मराठी लोकांचे आपल्या संस्कृतीशी व साहित्याशी असलेले अतूट नातेच दर्शवितात. आजकालच्या इंटरनेट-युगात विविध मराठी संकेतस्थळे आणि ब्लॉग यांनी त्याचे स्वरूप आणखीनच व्यापक केले आहे. आणि असाच एक इंटरनेटचा सदुपयोग करून घेणारा प्रयत्न सुरू केलाय अमेरिकास्थित 'माय विश्व' नामक कंपनीने.
मराठी पुस्तके जास्तित जास्त वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांनी 'बुकगंगा' या संकेतस्थळाची व सेवेची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळावर मराठी व इतर काही भारतीय भाषांमधील २५ प्रकाशकांकडील तब्बल ७००० पुस्तके उपलब्ध आहेत. ती तुम्ही छापील (hardcopy) किंवा ई-पुस्तक (softcopy) स्वरूपात विकत घेऊ शकता. तसेच 'आय-बुकगंगा' (i-bookganga) या त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सॉफ्टवेअरमुळे ही पुस्तके i-pod, i-pad, i-phone इत्यादींवरही वाचता येऊ शकतात. तेव्हा तुम्ही या संकेतस्थळाला भेट देऊन आपले(ली) आवडते(ती) पुस्तक(के) खरेदी करू शकाल व कराल अशी अपेक्षा.
1 टिप्पणी:
I liked this post of yours which is very informative. I will visit the site and buy books of my choice.Thanks.
टिप्पणी पोस्ट करा