२९ ऑग, २०१०

रॉकफोर्डच्या गावाला जाऊया

रॉकफोर्ड नावाचा एक छोटुसा, गोड कुत्रा हरवतो आणि Land of Infinityमध्ये (लॅंड ऑफ इन्फिनिटी = सर्व काही अमर्याद असलेला प्रदेश) पोहोचतो. तिथे त्याला अनेक नाविन्यपूर्ण व आश्चर्यकारक प्राणी भेटतात. त्यातील प्रत्येकजण पृथ्वीवरून आजवर नामशेष झालेल्या प्रत्येक प्रकारच्या प्राण्यामधील शेवटचा उरलेला प्राणी असतो. ते नाच आणि गाण्याच्या माध्यमातून रॉकफोर्डला आपल्या विनाशाच्या कहाण्या सांगतात. तुमच्या मुलांना निसर्ग, सजीवांचे नामशेष होणे आणि निसर्गाची निगा राखायला आपण कसा हातभार लावू शकतो याबद्दल सांगण्याचा आहे की नाही हा उत्तम मार्ग?

Rockford’s rock opera (रॉकफोर्डस् रॉक ऑपेरा) हे ध्वनीजगतातील एक आगळे साहस आहे. आणि ते लहानथोर सगळ्यांसाठी आहे. सूत्रसंचालन, गाणी, अनेकविध कल्पक आवाज आणि व्हिडिओ यांनी बनलेले एक अजब रसायन म्हणजे रॉकफोर्डस् रॉक ऑपेरा. या सांगीतिक अनुभवाचे प्रमुख शिलेदार आहेत मॅथ्यु स्वीटअॅपल, स्टीव्ह पंट, एलेन स्वीटअॅपल आणि जेस हॉज. शिवाय इतर अनेकांची मदत या कलाकृतीला मिळाली आहे. या गोष्टीचा पहिला भाग (52 मिनिटे) त्यांच्या संकेतस्थळावर mp3 ध्वनिफितीच्या स्वरूपात डाऊनलोड करण्यास मोफत उपलब्ध आहे. शिवाय त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ऑपेरामधील काही भाग व्हिडिओ म्हणून उपलब्ध आहे. सोपे शब्द, सुरेल संगीत आणि सुंदर अॅनिमेशन्स यांच्या सहाय्याने ही अभिनव कलाकृती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खिळवून ठेवेल व काहीतरी खूप महत्त्वाचे शिकवून जाईल.

पण मॅथ्यु स्वीटअॅपल व त्यांचे सहकारी केवळ इथेच थांबलेले नाहीत. त्यांच्या संकेतस्थळावर मुलांना पर्यावरण व सजीवांचे नामशेष होणे याबद्दल शिकवण्यासाठी लागणारी माहिती व सहाय्यक साधनेही आहेत. रंग भरण्याचे 24 पानी पुस्तक, विविध माहितीपूर्ण चित्रे आणि व्हिडिओ हे ही तिथे विकत घेता येऊ शकतात. एवढेच नव्हे तर ही कलाकृती 2010मध्ये रंगमंचावरही घेऊन येण्याचा तिच्या निर्मात्यांचा मानस आहे. तर मग मनोरंजनातून शिक्षण याचे उत्तम उदाहरण असलेला हा ऑपेरा ऐकणार आणि ऐकवणार ना तुम्ही?