१२ सप्टें, २०१०

देणार्‍याने देतच जावे ...

आपणा सर्वांना महाभारतातील कर्ण तर माहितच आहे. उदारपणा व दानशूर वृत्तीची परिसीमा म्हणून आपण त्याला ओळखतो. जरी कर्णाइतक्या निःस्वार्थीपणाने नसेल तरी आयुष्यात कधीतरी आपण स्वतःचा विचार बाजूला ठेवून दुसर्‍या कोणासाठी काहीतरी केलेले असते. मग ती मदत आर्थिक असो किंवा इतर कुठल्याही प्रकारची, त्यात एक वेगळाच आनंद दडलेला असतो हे आपण सगळेच मान्य करू.

म्हणूनच मानवी स्वभावाच्या या पैलूवर आधारलेली 'Joy of Giving Week' (JGW, देण्यातून मिळणारा आनंद साजरा करण्याचा आठवडा) ही संकल्पना काही सेवाभावी संस्थांना सुचली. गेल्याच वर्षी सुरू झालेला हा उपक्रम २ ऑक्टोबरच्या (गांधी जयंती) अवतीभवतीच्या आठवड्यात साजरा केला जातो. म्हणजे २ ऑक्टोबरच्या आधी येणार्‍या रविवारी हा सप्ताह सुरू होतो व त्यानंतरच्या शनिवारी संपतो. यावर्षी २६ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत JGW साजरा होईल. JGW विषयीच्या Wikipedia नोंदीमध्ये त्याचे वर्णन 'festival of philanthrophy (परोपकाराचा सण)' असे केले आहे. गिव्ह इंडिया या संस्थेने सुरू केलेल्या उपक्रमात गूँज (Goonj), रिव्हरसाइड स्कूल (Riverside School), जॅम (Just another magazine), टूफल्स (Toofles) इत्यादी सेवाभावी संस्था तसेच अनेक प्रसारमाध्यमे, सुप्रसिद्ध व्यक्ती आणि सामान्य जनता यांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला. १००% स्वयंसेवकांच्या बळावर उभा असलेला हा उपक्रम शाळा, उद्योगसमूह, महाविद्यालये अशा विविध स्तरांवर साकारला जातो. JGWच्या Ning पानावर तुम्ही उपक्रम राबविण्यासाठी किंवा स्वयंसेवक म्हणून नोंदणी करू शकता. तसेच कुठल्या शहरात कुठले उपक्रम राबविले जात आहेत याची माहितीही तेथे उपलब्ध आहे.

तेव्हा JGWच्या Ning पानाला भेट द्या आणि (भारतात असाल तर) दुसर्‍यांना देण्यातून मिळणारा आनंद लुटण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते पहा किंवा (भारतात नसाल तरी) या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन मानवतेच्या भल्यासाठी काय करू शकाल ते पहा. या लेखाचा शेवट मला एका आफ्रिकन म्हणीने करावासा वाटतो, "या जगात बदल घडवून आणण्यासाठी आपण फार छोटे (आणि म्हणून असमर्थ) आहोत असे तुम्हाला वाटत असेल तर केवळ एकच डास असलेल्या बंद खोलीत झोपून पहा."

४ टिप्पण्या:

प्रभाकर कुळकर्णी म्हणाले...

मी स्वयंसेवक म्हणुन नोंदणी करेन.

Abhijit म्हणाले...

Denyaryane detach jaave.
Nice thoughts.

My view: Most people usually do not join any movement (weekly?) but keep on their philanthropic work in their owm small and sometimes secret ways.

Nice blog.
Keep up the good work.

My blogs:
http://hasatkhelat.blogspot.com
http://www.sportskatta.com

अनामित म्हणाले...

प्रत्येकाजवळ देण्यासारखे काही आहे याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने ब्हायला हवा.

Unknown म्हणाले...

@प्रभाकर: जरूर करा! प्रत्येकाने थोडा तरी वेळ द्यावा अशीच ही संकल्पना आहे.
@अभिजीत: मी आपल्या म्हणण्याशी संमत आहे. असे अनेक लोक आहेत जे कितीतरी चांगली कामे आपआपल्या परीने करत आहेत. मला जमेल तेवढ्यांविषयी माझ्या वाचकांना माहिती करून देण्याचा मी प्रयत्न करते.
@Anonymous: खरंय... बर्‍याचदा आपल्याला वाटत असते 'मी काय देणार?' पण तुम्ही जे काही देऊ शकता त्याची गरज असलेले या जगात कोणी ना कोणी नक्कीच सापडते.