आजचं ब्लॉगपोस्ट अगदी spontaneous आहे, अजिबात आधी न ठरवलेलं. गेल्या काही दिवसात पाहिलेल्या काही कार्यक्रमांच्या अनुषंगाने मनात आलेले काही विचार इथे मांडत आहे. त्यात बरेच प्रश्न आहेत आणि उत्तरं मात्र फार नाहीत. त्या प्रश्नांवर तुमची उत्तरं / प्रतिक्रिया ऐकायला मला आवडेल.
परवाच मी पहिल्या मराठी लोककला संमेलनातील पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाला गेले होते. पहिल्या दिवशीचे कार्यक्रम ‘आदिरंग’ या शीर्षकाखाली सादर झाले. म्हणजेच महाराष्ट्रातील आदिवासी बंधु-भगिनींच्या कलेचे विविध आविष्कार तसेच त्यावरील चर्चा असे या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमांचे स्वरूप होते. सगळ्या कार्यक्रमांत, मग तो आदिवासी तमाशा असो की बोहाडा की तारपा नृत्य, केवळ एक किंवा दोन वाद्यांच्या संगतीने सादरीकरण झाले. आणि ती वाद्यही किती साधी! ढोलकी, पिपाणी किंवा दुधी-बांबू-पालापाचोळा यांनी बनलेला तारपा. आपल्यासारख्या ‘सुसंस्कृत’ व ‘रसिक’ जनांना दहाएक मिनिटांनी कंटाळा येईल अशी साधारण एकच ठेका धरून केलेली ती नृत्यं किंवा गायलेली गाणी. आणि ती सर्व सादरीकरणे १५-२० मिनिटांची होती हे बरं झालं असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
ही सादरीकरणं पहाताना डोक्यात विचारचक्र सुरू झालं. फारसे बदल किंवा छटा नसलेले हे नाच व गाणी आपल्याला दहा-पंधरा मिनिटं झाली की कंटाळवाणी वाटतात. पण याच नाच आणि गाण्यांसह हे आदिवासी लोक मात्र रात्र रात्र जागवतात. थोड्याफार बदलाने तेच सूर आणि तोच ठेका यांच्या पलिकडे जावे असे त्यांना वाटत नाही का? आणि मग आपण ‘नागर संस्कृती’तील लोकही एकेकाळी जर असेच होतो तर मग आपल्यातील बदल कसा घडून आला? या प्रश्नांची उत्तरं उत्क्रांतीवाद देऊ शकेल का याबद्दल मला शंका आहे. असो. मग अचानक मला आठवण झाली ती काही दिवसांपूर्वी मी टीव्हीवर पाहिलेल्या एका ‘संगीतरजनी’ची (concert). हजारो प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं पटांगण, त्याच्या एका टोकाला एक भव्य व्यासपीठ, त्यावर ५० ते ६० च्या आसपास (किंवा जास्तच) वादक, त्या हजारो प्रेक्षकांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी तितकीच सशक्त आणि सुसज्ज ‘साऊंड सिस्टिम’ असा (अपेक्षेप्रमाणे) त्या कार्यक्रमाचा बाज होता. मला त्या संगीतरजनीची आणि आदिरंगची तुलना केल्याशिवाय रहावलं नाही. एक-दोन वाद्य आणि मोजकेच ठेके इथपासून आपण ३०-४० (किंवा जास्तच) वाद्य, तितकेच ठेके आणि त्यांचा योग्य मिलाफ इथपर्यंत येऊन पोहोचलोय. यालाच आपण ‘प्रगती’ म्हणतो आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे.
पण मग असाही विचार मनात आला. जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी किंवा विरंगुळा म्हणून या आदिजनांना मोजकी साधी वाद्य, मोजकेच ठेके आणि त्यावर रचलेली साधीशी नृत्य किंवा गाणी एवढेच पुरेसं होतं. आणि आज तुमच्या-माझ्यासारख्या ‘अभिजनां’च्या तोंडून (हल्ली बरीच रूढ असलेली दाद) “क्या बात है!” यायला अनेक वाद्य, नसलेल्या वाद्यांचे, वस्तूंचे आणि सजिवांचेही आवाज काढणारा सिंथेसायझर, अनेक गायक आणि त्यांच्या आवाजावर डिजिटायझेशनने केलेल्या करामती एवढा सगळा लवाजमा लागतो! आनंदाची आपली कल्पना किती बदलली आहे. हे त्याचं केवळ एकच उदाहरण झालं. हल्ली पाश्चात्य देशातील विचारवंत आपल्याच प्राचीन तत्वज्ञानाचा अभ्यास करून “जीवनातील साध्या साध्या गोष्टींतून आनंद मिळवा.” हे ‘न्यू एज फिलॉसॉफी’च्या नावाखाली जगाला सांगतात. आणि आपण मात्र आपला आनंद दिवसेंदिवस जास्तच अनैसर्गिक, महागड्या व गुंतागुंतीच्या गोष्टींमध्ये शोधू लागलो आहे.
1 टिप्पणी:
याचे कारण अभिजन आपल्या कपड्यांवर डाग पडणार
नाही याची खात्री झाल्यावरच कलेचा आस्वाद घेतात.
टिप्पणी पोस्ट करा