सर्वसाधारणपणे मानव स्वतःला पृथ्वीवरील सगळ्यात बुद्धिमान व म्हणून तांत्रिकदृष्ट्या सगळ्यात प्रगत जीव समजतो. आपल्या स्वतःच्याच व्याख्येप्रमाणे आपण सर्वात बुद्धिमान असूदेखील. परंतु निसर्गाच्या अनेक करामतींकडे जर बारकाईने पाहिले तर तो मानवापेक्षा कितीतरी श्रेष्ठ कलाकृती (हो, त्यांना कलाकृतीच म्हणायला हवे) कितीतरीपट सहजतेने निर्माण करतो असे दिसून येईल. वैज्ञानिक लेखिका Janine Benyus (जनीन बेन्यस) यांनी अनेक वर्षे अशा अनेक नैसर्गिक प्रक्रियांचा अभ्यास केला आहे. आणि त्यांनी अभियंत्यांपासून स्थापत्यविशारद आणि अगदी संगणकशास्त्रज्ञांपर्यंत सर्वांना विस्मयचकित करून सोडले आहे! का ते त्यांचे हे TED talks (टेक्नॉलॉजी, एंटरटेन्मेंट अॅंड डिझाईन = तंत्रज्ञान, मनोरंजन आणि आराखडा) मधील सादरीकरण पाहून तुम्हाला कळेल.
जनीन सुंदर पॉवरपॉइंट स्लाइडस् व अतिशय माहितीपूर्ण आणि मनोरंजक भाषण यांच्या सहाय्याने आपल्याला निसर्गापासून किती शिकण्यासारखे आहे हे सहजपणे दाखवून देते. निसर्गात असे कितीतरी सजीव आहेत ज्यांनी आपल्याला अनेक गोष्टींच्या निर्मितीमध्ये भंडावणारे प्रश्न आधीच सोडवून ठेवले आहेत. त्यापैकी एक उदहरण म्हणजे कॅल्शिअम कार्बोनेट (CaCO3)पासून बनणारे शिंपले आपली वाढ करण्यासाठी तसेच थांबविण्यासाठी वेगवेगळी प्रथिने वापरतात. आपल्या पाण्याच्या पाईपमध्ये साचून ते निकामी करणारे CaCO3 रोखण्यासाठी शिंपल्याची वाढ थांबविणार्या प्रथिनाची नक्कल (mimicry) करणारा पदार्थ वापरला जातो. जनीन अशी अनेक विस्मयकारक उदाहरणे देते. विविध सजीव पर्यावरणाशी जुळवून घेताना कोणत्या प्रक्रिया वापरतात त्याचे निरीक्षण करून तंत्रज्ञ व अभियंते बरेच काही शिकू शकतात. आणि सुदैवाने ही प्रक्रिया याआधीच सुरू झाली आहे. अनेक अभियंते, वास्तुविशारद, तंत्रज्ञ जनीनसारख्या निसर्ग-अभ्यासकांकडे “आम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जा आणि ज्ञानसमृद्ध करा!” असा लकडा लावू लागले आहेत. आणि अनेक बड्या उद्योगांनी जीवशास्त्रज्ञ तसेच निसर्ग-अभ्यासकांना आपल्या आराखडा आखण्याबद्दलच्या चर्चांमध्ये समाविष्ट करायला सुरुवात केली आहे.
जनीन तिच्या सादरीकरणात काही महत्त्वाचे मुद्दे मांडते. सर्व मानवनिर्मित वस्तू पर्यावरण दूषित करतात. कुठलीही नैसर्गिक निर्मिती तसे करत नाही. म्हणजे त्याबाबतीत आपण निसर्गापेक्षा उणे ठरतो. तसेच आपण कुठलीही वस्तू top down (मोठ्यापासून सुरुवात करून त्यातून लहान गोष्ट निर्माण करणे) पद्धतीने करतो ज्यामुळे सुरुवातीला असलेला 96% पदार्थ वाया जातो. निसर्ग त्याउलट अगदी कमी पदार्थापासून सुरुवात करून त्याला माहिती / आकार पुरवून त्याला उपयोगी बनवतो. नैसर्गिकपणे उपलब्ध असलेल्या वस्तूंचा अगर जीवांचा उपयोग करून एखादी प्रक्रिया यशस्वी झाली तर त्याला Bio-assisted technology (बायो-असिस्टेड टेक्नॉलॉजी) असे म्हणतात. पण Bio-mimicry (बायो-मिमिक्री) म्हणजे एखाद्या नैसर्गिक प्रक्रियेची जशीच्या तशी नक्कल करून ती आपल्या उपयोगास आणणे. तिच्या या सादरीकरणाच्या शेवटी ज्यांच्यावर एकतर संशोधन चालू आहे किंवा जी यशस्वीपणे वापरली जात आहेत अशी बायो-मिमिक्रीची तब्बल 10 उदाहरणे जनीन देते.
तेव्हा तुम्ही हे सादरीकरण पहाल व त्यापासून काहीतरी तुम्हाला शिकता येईल किंवा नवीन कळेल अशी मला आशा आहे. मानवाच्या बुद्धिमत्तेबद्दल नक्कीच काही शंका नाही. परंतू निसर्गाने मात्र आपले गुरुतुल्य स्थान आजपर्यंत अबाधित राखले आहे एवढे खरे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा