काही दिवसांपूर्वी यूट्यूबची मुशाफिरी करता करता मी प्राचीन संस्कृतींबद्दलच्या काही व्हिडिओंपर्यंत येऊन पोहोचले. प्राचीन काळातील संस्कृती, अगदी चिलीपासून चीनपर्यंत, हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातूनही या संस्कृतींची वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती याविषयी मला फारच उत्सुकता आहे. त्यामुळे मी हे व्हिडिओ न पहाणे शक्यच नव्हते.
बहुतेकवेळा आजचे प्रगत मानव स्वतःला पृथ्वीवरील पहिलेवहिले प्रगत मानव मानतात. आपल्यापूर्वी वैज्ञानिक व तांत्रिकदृष्ट्या प्रगती केलेली मानवी संस्कृती जगात होती हे आपण मुळी मान्यच करू इच्छित नाही. हा हट्ट पाश्चात्य देशांमध्ये जास्त आहे. भारतासारख्या देशात आपण महाभारत व रामायणासारख्या ऐतिहासिक गोष्टींमधून प्राचीन प्रगत संस्कृतींबद्दल ऐकत आलो आहोत. आणि या गोष्टी आपल्याला पौराणिक कथा म्हणून नव्हे तर इतिहास म्हणून सांगितल्या जातात. यूट्यूबवरील या व्हिडिओंमध्येही अशीच प्राचीन संस्कृतींच्या वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीची अनेक उदाहरणे दाखविली आहेत. त्यापैकी डिस्कव्हरी चॅनलने तयार केलेल्या Lost treasures of ancient world (लॉस्ट ट्रेजर्स ऑफ एन्शंट वर्ल्ड = प्राचीन जगतातील हरवलेले खजिने) या मालिकेतील भारताविषयीचा भाग यूट्यूबवर 5 व्हिडिओमध्ये विभागून दाखवलेला आहे. मी त्यातील पहिला भाग इथे समाविष्ट करत आहे. इतर भाग आपण यूट्यूबवर पहाल अशी अपेक्षा.
डिस्कव्हरीने तयार केलेल्या या कार्यक्रमात प्राचीन भारताचा सामाजिक व राजकीय इतिहास आणि त्याचा भारतातील वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीवर झालेला परिणाम यांचा बारकाईने आढावा घेतलेला आहे. सुंदर अॅनिमेशन्सच्या सहाय्याने त्यात पुरातन मोहें-जो-दारो शहर पुन्हा जिवंत केले आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीची माहिती असलेल्या किंवा नसलेल्या कोणीही पहावा असाच हा कार्यक्रम आहे. मात्र एक गोष्ट मला खटकली ती म्हणजे निवेदकाचे भारतीय शब्दांचे उच्चार! कोणाही पाश्चात्य व्यक्तीकडून शुद्ध भारतीय उच्चारांची अपेक्षा नाही. परंतू या निवेदकाचे उच्चार ऐकणे हा कुठ्ल्याही भारतीयावर अत्याचारच होइल. तेव्हा जरा मन घट्ट करा पण हे व्हिडिओ पहा जरूर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा