आपल्या पृथ्वीवरील 75% भाग पाण्याखाली आहे. साधारणपणे 2 मैल खोलीच्या या महासागरातच पृथ्वीवरील सर्वात लांब पर्वतरांग आहे. आणि पृथ्वीवरील बहुसंख्य सजीव, ज्वालामुखी आणि भूकंपक्षेत्रेदेखील समुद्रातच आहेत. अशा या बहुरंगी – बहुढंगी सागराविषयी प्रख्यात सागरविशारद डेव्हिड गॅलो म्हणतात, “टायटॅनिक ही काही समुद्रातील सगळ्यात अद्भुत गोष्ट नव्हे. आपण समुद्राबद्दल बाळगायला हवे तितके कुतुहल बाळगत नाही. समुद्रकिनार्यावर उभे रहाणे म्हणजे एखाद्या अनोळखी प्रदेशाच्या, जगाच्या काठावर उभे रहाण्यासारखे आहे.” आणि म्हणूनच या अनोळखी जगाची थोडीशी ओळख आपल्याला करून देण्यासाठी डेव्हिड गॅलो त्यांच्या सादरीकरणात काही विस्मयकारक व मनोरंजक चित्रफिती दाखवतात.
समुद्रामध्ये submersibleच्या (सब्मर्सिबल = पाणबुडीसारखे छोटे वाहन) सर्वसाधारण वेगाने खाली जात राहिल्यावर साधारणपणे 2.5 तासांनी सूर्यप्रकाशाचे साम्राज्य संपते व काळ्याकुट्ट अंधाराने आपण वेढले जातो. परंतु या अंधाराची भिती वाटायला लागायच्या आधीच bioluminescenceच्या (बायोल्युमिनेसेन्स = सजिवांनी त्यांच्या शरीरातील रासायनिक प्रक्रियांपासून निर्माण केलेला प्रकाश, उदा. काजवा) अनेक चित्तवेधक दृष्यांकडे आपले लक्ष वेधले जाते. या अंधारलेल्या, प्रचंड दाबाच्या व अतिशय कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या पर्यावरणातील बहुतांश सजीव हे jellyfish (जेलीफिश) प्रकारातील असतात. आणि ते बायोल्युमिनेसेन्सचा उपयोग आपण दुसर्याचे भक्ष्य न होता स्वतःला मात्र भक्ष्य मिळावे यासाठी करतात.
थोड्याशा उथळ पाण्यात cephalopods (सेफलोपॉड्स = ‘डोके आणि पाय’ असे भाषांतर करता येईल अशा ग्रीक शब्दावरून) या गटात मोडणारे ऑक्टोपस (octopus), स्क्विड (squid), कटलफिश (cuttlefish) हे मनोरंजक प्राणी वस्तीला असतात. त्यांना पाण्यातील कमीलियन (chameleon) सरडे म्हणता येईल. हे सजीव आपल्या आजूबाजूच्या परिसरातील उजेडाची कमीजास्त तीव्रता, रंगसंगती, पोत (texture) याचे अचूक निरीक्षण करतात. आणि आपल्या कातडीतील रंगकणांच्या सहाय्याने त्याची सहीसही नक्कल करून त्या परिसरात अदृश्य होऊन जातात. डेव्हिड गॅलोंच्या दोन्ही चित्रफितींमध्ये याची अनेक विस्मयकारी उदाहरणे दिसून येतात. परंतु त्यांच्या पहिल्या चित्रफितीतील 4 मिनिटे 30 सेकंदाला सुरू होणार्या ऑक्टोपसच्या बहुरूपी कामगिरीला तोड नाही!
समुद्रातील ज्वालामुखींमुळे hydrothermal vents (हायड्रोथर्मल व्हेंट्स = अतिशय उच्च तापमानाचे पाणी व हायड्रोजन सल्फाईड वायू बाहेर फेकणारी नैसर्गिक धुरांडी) निर्माण होतात. डेव्हिड गॅलो अत्यंत मार्मिकपणे म्हणतात, “या परिसंस्था (ecosystem) इतक्या विषारी आहेत की ही रसायने जर तुम्ही समुद्रात सोडायला निघालात तर सरकार कधीच परवानगी देणार नाही!” मानवाला अतिशय हानिकारक व विषारी ठरणार्या या पर्यावरणात अनेकविध प्रकारचे सजीव गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात. पावसाळी प्रदेशातील जंगलांपेक्षा जास्त वैविध्य आणि दाटी इथल्या जीवसृष्टीत दिसून येते. या परिसंस्थेच्या अभ्यासातून सापडलेले 99% सजीव हे आपल्यासाठी नवीन होते.
जाताजाता डेव्हिड गॅलो आपल्याला एक खूप वेगळा संदेश देतात. निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही चक्राकार असते, आवर्तने घेते, येते, जाते आणि पुन्हा येते. तेव्हा कोणतीही नैसर्गिक गोष्ट टिकवून ठेवण्याचा (to preserve) किंवा तिची राखण करण्याचा (to conserve) प्रयत्न आपण करू नये. त्यापेक्षा येणार्या नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकावे.
1 टिप्पणी:
atishay sundar maahiti dili aahe.dhanyawad !
shabd -chachapani chi kaa garaj asaavi ?
http://savadhan.wordpress.com
Ny-USA
टिप्पणी पोस्ट करा