१५ ऑग, २०१०

हिंदुस्तान, इंडिया की भारत?

आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली. त्याबद्दल बरेच लोक बरेच काही लिहितील. या त्रेसष्ठ वर्षांतील बर्‍यावाईट घटना, घडामोडी, प्रगती (किंवा अधोगती) यांविषयी बराच उहापोह होईल. मी मात्र नेहमीप्रमाणे एका वेगळ्याच मुद्द्याविषयी माझे विचार मांडणार आहे.

 What's in a name? (नावात काय आहे?) हा प्रश्न / विचार शेक्सपिअरच्या जुलिएटमुळे प्रसिद्धी पावला. पण रोजच्या जीवनात आपल्याला आपल्या नावाबद्दल इतके निरीच्छ रहाता येते का? तुम्हाला जर कोणी कुठल्यातरी वेगळ्याच नावाने हाक मारली तर एकतर तुम्ही लक्षच देणार नाही किंवा ती हाक आपल्याला उद्देशून होती हे कळल्यावर समोरच्याची चूक तुम्ही सुधाराल. आणि जर कोणी सारखेच तुम्हाला चुकिच्या नावाने संबोधत राहिले तर शेवटी तुम्ही चिडाल. कारण आपणा प्रत्येकाला आपले नाव हा आपल्या ओळखीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा एक मोठा भाग वाटतो. गेल्या काही वर्षांत आपण भारतीयांनी हा "बरोबर नावा"चा आग्रह आपल्या देशातील काही शहरांच्या बाबतीतही दाखवला आणि अजूनही दाखवत आहोत. म्हणूनच मग त्रिवेंद्रमचे तिरुअनंतपुरम् झाले, बॉम्बेची मुंबई झाली आणि अगदी हल्लीचेच सांगायचे तर बॅंगलोरचे झालेय बेंगळूरु!

पण मग हा सगळा "बरोबर नावां"चा अट्टाहास करताना आपण आपल्या देशाला का विसरतो? आपल्यातील कितीजण (मी ही त्यात आले) आपल्या देशाचे नाव 'भारत'ऐवजी 'हिंदुस्तान' किंवा 'इंडिया' असे सांगतात? आता मला माहीत आहे की तुमच्यातील चौकस लोक लगेच इंटरनेटवर संशोधन करून इथे कॉमेंट करतील की 'भारत' या नावासारखीच 'इंडिया' या नावालादेखील देशाचे अधिकृत नाव म्हणून आपल्या घटनेतच मान्यता मिळालेली आहे. आणि ते तथ्य आहे. पण माझे वैयक्तिक आणि प्रामाणिक मत असे आहे की आपल्या देशाला केवळ 'भारत' म्हटले गेले पाहिजे. कारण इतर दोन्ही नावे ही परदेशातील प्रवासी, व्यापारी व राज्यकर्ते यांनी आपल्या देशाला दिलेली नावे आहेत. दोन्ही नावांची उत्पत्ती (पूर्वीच्या) हिंदूस्तानच्या उत्तरेतील सिंधू नदीच्या नावावरून झाली आहे. सिंधूची ग्रीकमध्ये झाली 'इंडस्' आणि फारसी/पर्शियन भाषेत झाली 'हिंदू'. आणि अनुक्रमे 'भारतवर्षा'चा झाला 'इंडिया' आणि 'हिंदूस्तान'.

म्हणजे ही दोन्ही नावे स्वातंत्र्यपूर्व काळात दिलेली आणि वापरली जाणारी आहेत. आता जे भारत + पाकिस्तान + बांग्लादेश + श्रीलंका + म्यानमार आहे ते सर्व पूर्वी ब्रिटिशांच्या अंमलाखाली होते. यांपैकी भारत सोडून कुठल्याही देशाने आपले स्वातंत्र्यपूर्व नाव पुढे चालू ठेवलेले नाही. हिंदूस्तानच्या उत्तर-पश्चिमेतील काही प्रांतांपासून (तेव्हा पश्चिम) पाकिस्तान बनला. तर पूर्व बंगालचा झाला पूर्व पाकिस्तान (आणि नंतर बांग्लादेश). सिलोन आणि बर्मा यांनी यथावकाश आपली नावे बदलून अनुक्रमे श्रीलंका व म्यानमार केली. भारत मात्र स्वतःला अजूनही (अधिकृतपणे) 'इंडिया' म्हणतो आणि म्हणवून घेतो. आणि अनेक भारतीय (अनधिकृतरित्या का होईना) त्याला 'हिंदूस्तान'ही म्हणतात.

बॉम्बे ऐवजी मुंबईचा आणि गुवाहाटी ऐवजी गौहत्तीचा आग्रह  धरणारे आपण "Proud to be a Bhaarateeya" कधी होणार?

६३व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद! ... का जय भारत?

५ टिप्पण्या:

Vinay म्हणाले...

तुम्ही जे लिहिलं आहे, ते एकदम बरोबर आहे. India आणि हिंदुस्तान ही इतरांनी दिलेली नावं आहेत. पण आपल्याला सवय आहे, जे इतर देशीय (विशेष करून युरोप आणि अमेरिका) म्हणतील ते शिरसावंद्य, म्हणून आपण ते वापरतो.

मुळात जे "हिंदू" आहेत, त्यांना पण "हिंद (म्हणजे सिंध नदी) पलीकडील लोक" म्हणून संबोधण्यासाठी वापरलेला शब्द प्रयोग होता. पण आपण त्याला धर्माची संज्ञा दिली. आपला धर्म "हिंदू" नसून तो सनातन धर्म आहे. हे कुणी लक्षात आणून देत नाही.

Unknown म्हणाले...

विनय, तुम्ही हिंदू धर्माच्या नावाबद्दल जे म्हटले आहे त्याबद्दल अगदी दोनच दिवसांपूर्वी माझी एका मैत्रिणीबरोबर चर्चा झाली. गर्व से कहो ... म्हणणार्‍यांनी आधी स्वतःच्या धर्माचे योग्य नाव काय आहे त्याची शहानिशा करून घ्यायला हवी.

Unknown म्हणाले...

uttam.
Aaapan Ase mhanayala Suruvat karuya " garvse kaho SANATANI !" Chalel kaay ?
Ajun Aamachya Netyana Prajasattak Din Aani Swatantrya Din Yatala pharak samajat naahi.Mumbait 15 -8-10 la Prajasttak din sajara karanyababt che phlak jhalakat aahet Mhane.

Unknown म्हणाले...

@सावधान: मला विचाराल तर माणसाला "गर्व" कशाचाच नसावा :) ... अभिमान असणे ठीक आहे. आणि हो, मुंबईत एका राजकारण्याने असा फलक लावला होता खरा. खरोखरच लाजिरवाणी गोष्ट!

प्रभाकर कुळकर्णी म्हणाले...

मी आजपासुन माझ्या बोलन्यात शक्यतोवर "भारत" च म्हणनार. खरंच आपल्या एव्हढ्या चांगल्या धर्माला काय म्हनावे?माझ्या मते तो सगळ्यात जास्त जुना धर्म असल्याने त्याला काही नाव च देन्यात आले नसावे.हिन्दू हे नाव ईतरांनी दिलेले आहे हे अगदी खरे.पन त्याचा अर्थ तरी योग्य आहे की नाही कुनास ठावूक?