तंत्रज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तंत्रज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

५ सप्टें, २०१०

'बुकगंगा'च्या स्वरूपात ज्ञानगंगा

१ सप्टेंबरच्या लोकसत्ता मुंबई वृत्तांतमध्ये एक बातमी वाचनात आली आणि आपल्या ब्लॉगवर त्याबद्दल लिहून आणखी बर्‍याच लोकांना त्याची माहिती करून द्यावी असे वाटले. मराठी भाषा, व पर्यायाने मराठी भाषिक लोक, दर्जेदार साहित्यनिर्मितीच्या बाबतीत केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगभरातही नावाजलेले आहेत. महाविद्यालयातील मराठी वाङमय मंडळे आणि परदेशातील शहराशहरात असलेली मराठी मंडळे ही मराठी लोकांचे आपल्या संस्कृतीशी व साहित्याशी असलेले अतूट नातेच दर्शवितात. आजकालच्या इंटरनेट-युगात विविध मराठी संकेतस्थळे आणि ब्लॉग यांनी त्याचे स्वरूप आणखीनच व्यापक केले आहे. आणि असाच एक  इंटरनेटचा सदुपयोग करून घेणारा प्रयत्न सुरू केलाय अमेरिकास्थित 'माय विश्व' नामक कंपनीने.

मराठी पुस्तके जास्तित जास्त वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांनी 'बुकगंगा' या संकेतस्थळाची व सेवेची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळावर मराठी व इतर काही भारतीय भाषांमधील २५ प्रकाशकांकडील तब्बल ७००० पुस्तके  उपलब्ध आहेत. ती तुम्ही छापील (hardcopy) किंवा ई-पुस्तक (softcopy) स्वरूपात विकत घेऊ शकता. तसेच 'आय-बुकगंगा' (i-bookganga) या त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सॉफ्टवेअरमुळे ही पुस्तके i-pod, i-pad, i-phone इत्यादींवरही वाचता येऊ शकतात. तेव्हा तुम्ही या संकेतस्थळाला भेट देऊन आपले(ली) आवडते(ती) पुस्तक(के) खरेदी करू शकाल व कराल अशी अपेक्षा.

२५ जुलै, २०१०

निसर्ग आपला गुरू

सर्वसाधारणपणे मानव स्वतःला पृथ्वीवरील सगळ्यात बुद्धिमान व म्हणून तांत्रिकदृष्ट्या सगळ्यात प्रगत जीव समजतो. आपल्या स्वतःच्याच व्याख्येप्रमाणे आपण सर्वात बुद्धिमान असूदेखील. परंतु निसर्गाच्या अनेक करामतींकडे जर बारकाईने पाहिले तर तो मानवापेक्षा कितीतरी श्रेष्ठ कलाकृती (हो, त्यांना कलाकृतीच म्हणायला हवे) कितीतरीपट सहजतेने निर्माण करतो असे दिसून येईल. वैज्ञानिक लेखिका Janine Benyus (जनीन बेन्यस) यांनी अनेक वर्षे अशा अनेक नैसर्गिक प्रक्रियांचा अभ्यास केला आहे. आणि त्यांनी अभियंत्यांपासून स्थापत्यविशारद आणि अगदी संगणकशास्त्रज्ञांपर्यंत सर्वांना विस्मयचकित करून सोडले आहे! का ते त्यांचे हे TED talks (टेक्नॉलॉजी, एंटरटेन्मेंट अॅंड डिझाईन = तंत्रज्ञान, मनोरंजन आणि आराखडा) मधील सादरीकरण पाहून तुम्हाला कळेल.

जनीन सुंदर पॉवरपॉइंट स्लाइडस् व अतिशय माहितीपूर्ण आणि मनोरंजक भाषण यांच्या सहाय्याने आपल्याला निसर्गापासून किती शिकण्यासारखे आहे हे सहजपणे दाखवून देते. निसर्गात असे कितीतरी सजीव आहेत ज्यांनी आपल्याला अनेक गोष्टींच्या निर्मितीमध्ये भंडावणारे प्रश्न आधीच सोडवून ठेवले आहेत. त्यापैकी एक उदहरण म्हणजे कॅल्शिअम कार्बोनेट (CaCO3)पासून बनणारे शिंपले आपली वाढ करण्यासाठी तसेच थांबविण्यासाठी वेगवेगळी प्रथिने वापरतात. आपल्या पाण्याच्या पाईपमध्ये साचून ते निकामी करणारे CaCO3 रोखण्यासाठी शिंपल्याची वाढ थांबविणार्‍या प्रथिनाची नक्कल (mimicry) करणारा पदार्थ वापरला जातो. जनीन अशी अनेक विस्मयकारक उदाहरणे देते. विविध सजीव पर्यावरणाशी जुळवून घेताना कोणत्या प्रक्रिया वापरतात त्याचे निरीक्षण करून तंत्रज्ञ व अभियंते बरेच काही शिकू शकतात. आणि सुदैवाने ही प्रक्रिया याआधीच सुरू झाली आहे. अनेक अभियंते, वास्तुविशारद, तंत्रज्ञ जनीनसारख्या निसर्ग-अभ्यासकांकडे “आम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जा आणि ज्ञानसमृद्ध करा!” असा लकडा लावू लागले आहेत. आणि अनेक बड्या उद्योगांनी जीवशास्त्रज्ञ तसेच निसर्ग-अभ्यासकांना आपल्या आराखडा आखण्याबद्दलच्या चर्चांमध्ये समाविष्ट करायला सुरुवात केली आहे.

जनीन तिच्या सादरीकरणात काही महत्त्वाचे मुद्दे मांडते. सर्व मानवनिर्मित वस्तू पर्यावरण दूषित करतात. कुठलीही नैसर्गिक निर्मिती तसे करत नाही. म्हणजे त्याबाबतीत आपण निसर्गापेक्षा उणे ठरतो. तसेच आपण कुठलीही वस्तू top down (मोठ्यापासून सुरुवात करून त्यातून लहान गोष्ट निर्माण करणे) पद्धतीने करतो ज्यामुळे सुरुवातीला असलेला 96% पदार्थ वाया जातो. निसर्ग त्याउलट अगदी कमी पदार्थापासून सुरुवात करून त्याला माहिती / आकार पुरवून त्याला उपयोगी बनवतो. नैसर्गिकपणे उपलब्ध असलेल्या वस्तूंचा अगर जीवांचा उपयोग करून एखादी प्रक्रिया यशस्वी झाली तर त्याला Bio-assisted technology (बायो-असिस्टेड टेक्नॉलॉजी) असे म्हणतात. पण Bio-mimicry (बायो-मिमिक्री) म्हणजे एखाद्या नैसर्गिक प्रक्रियेची जशीच्या तशी नक्कल करून ती आपल्या उपयोगास आणणे. तिच्या या सादरीकरणाच्या शेवटी ज्यांच्यावर एकतर संशोधन चालू आहे किंवा जी यशस्वीपणे वापरली जात आहेत अशी बायो-मिमिक्रीची तब्बल 10 उदाहरणे जनीन देते.

तेव्हा तुम्ही हे सादरीकरण पहाल व त्यापासून काहीतरी तुम्हाला शिकता येईल किंवा नवीन कळेल अशी मला आशा आहे. मानवाच्या बुद्धिमत्तेबद्दल नक्कीच काही शंका नाही. परंतू निसर्गाने मात्र आपले गुरुतुल्य स्थान आजपर्यंत अबाधित राखले आहे एवढे खरे.