भारत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भारत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१२ सप्टें, २०१०

देणार्‍याने देतच जावे ...

आपणा सर्वांना महाभारतातील कर्ण तर माहितच आहे. उदारपणा व दानशूर वृत्तीची परिसीमा म्हणून आपण त्याला ओळखतो. जरी कर्णाइतक्या निःस्वार्थीपणाने नसेल तरी आयुष्यात कधीतरी आपण स्वतःचा विचार बाजूला ठेवून दुसर्‍या कोणासाठी काहीतरी केलेले असते. मग ती मदत आर्थिक असो किंवा इतर कुठल्याही प्रकारची, त्यात एक वेगळाच आनंद दडलेला असतो हे आपण सगळेच मान्य करू.

म्हणूनच मानवी स्वभावाच्या या पैलूवर आधारलेली 'Joy of Giving Week' (JGW, देण्यातून मिळणारा आनंद साजरा करण्याचा आठवडा) ही संकल्पना काही सेवाभावी संस्थांना सुचली. गेल्याच वर्षी सुरू झालेला हा उपक्रम २ ऑक्टोबरच्या (गांधी जयंती) अवतीभवतीच्या आठवड्यात साजरा केला जातो. म्हणजे २ ऑक्टोबरच्या आधी येणार्‍या रविवारी हा सप्ताह सुरू होतो व त्यानंतरच्या शनिवारी संपतो. यावर्षी २६ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत JGW साजरा होईल. JGW विषयीच्या Wikipedia नोंदीमध्ये त्याचे वर्णन 'festival of philanthrophy (परोपकाराचा सण)' असे केले आहे. गिव्ह इंडिया या संस्थेने सुरू केलेल्या उपक्रमात गूँज (Goonj), रिव्हरसाइड स्कूल (Riverside School), जॅम (Just another magazine), टूफल्स (Toofles) इत्यादी सेवाभावी संस्था तसेच अनेक प्रसारमाध्यमे, सुप्रसिद्ध व्यक्ती आणि सामान्य जनता यांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला. १००% स्वयंसेवकांच्या बळावर उभा असलेला हा उपक्रम शाळा, उद्योगसमूह, महाविद्यालये अशा विविध स्तरांवर साकारला जातो. JGWच्या Ning पानावर तुम्ही उपक्रम राबविण्यासाठी किंवा स्वयंसेवक म्हणून नोंदणी करू शकता. तसेच कुठल्या शहरात कुठले उपक्रम राबविले जात आहेत याची माहितीही तेथे उपलब्ध आहे.

तेव्हा JGWच्या Ning पानाला भेट द्या आणि (भारतात असाल तर) दुसर्‍यांना देण्यातून मिळणारा आनंद लुटण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते पहा किंवा (भारतात नसाल तरी) या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन मानवतेच्या भल्यासाठी काय करू शकाल ते पहा. या लेखाचा शेवट मला एका आफ्रिकन म्हणीने करावासा वाटतो, "या जगात बदल घडवून आणण्यासाठी आपण फार छोटे (आणि म्हणून असमर्थ) आहोत असे तुम्हाला वाटत असेल तर केवळ एकच डास असलेल्या बंद खोलीत झोपून पहा."

१५ ऑग, २०१०

हिंदुस्तान, इंडिया की भारत?

आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली. त्याबद्दल बरेच लोक बरेच काही लिहितील. या त्रेसष्ठ वर्षांतील बर्‍यावाईट घटना, घडामोडी, प्रगती (किंवा अधोगती) यांविषयी बराच उहापोह होईल. मी मात्र नेहमीप्रमाणे एका वेगळ्याच मुद्द्याविषयी माझे विचार मांडणार आहे.

 What's in a name? (नावात काय आहे?) हा प्रश्न / विचार शेक्सपिअरच्या जुलिएटमुळे प्रसिद्धी पावला. पण रोजच्या जीवनात आपल्याला आपल्या नावाबद्दल इतके निरीच्छ रहाता येते का? तुम्हाला जर कोणी कुठल्यातरी वेगळ्याच नावाने हाक मारली तर एकतर तुम्ही लक्षच देणार नाही किंवा ती हाक आपल्याला उद्देशून होती हे कळल्यावर समोरच्याची चूक तुम्ही सुधाराल. आणि जर कोणी सारखेच तुम्हाला चुकिच्या नावाने संबोधत राहिले तर शेवटी तुम्ही चिडाल. कारण आपणा प्रत्येकाला आपले नाव हा आपल्या ओळखीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा एक मोठा भाग वाटतो. गेल्या काही वर्षांत आपण भारतीयांनी हा "बरोबर नावा"चा आग्रह आपल्या देशातील काही शहरांच्या बाबतीतही दाखवला आणि अजूनही दाखवत आहोत. म्हणूनच मग त्रिवेंद्रमचे तिरुअनंतपुरम् झाले, बॉम्बेची मुंबई झाली आणि अगदी हल्लीचेच सांगायचे तर बॅंगलोरचे झालेय बेंगळूरु!

पण मग हा सगळा "बरोबर नावां"चा अट्टाहास करताना आपण आपल्या देशाला का विसरतो? आपल्यातील कितीजण (मी ही त्यात आले) आपल्या देशाचे नाव 'भारत'ऐवजी 'हिंदुस्तान' किंवा 'इंडिया' असे सांगतात? आता मला माहीत आहे की तुमच्यातील चौकस लोक लगेच इंटरनेटवर संशोधन करून इथे कॉमेंट करतील की 'भारत' या नावासारखीच 'इंडिया' या नावालादेखील देशाचे अधिकृत नाव म्हणून आपल्या घटनेतच मान्यता मिळालेली आहे. आणि ते तथ्य आहे. पण माझे वैयक्तिक आणि प्रामाणिक मत असे आहे की आपल्या देशाला केवळ 'भारत' म्हटले गेले पाहिजे. कारण इतर दोन्ही नावे ही परदेशातील प्रवासी, व्यापारी व राज्यकर्ते यांनी आपल्या देशाला दिलेली नावे आहेत. दोन्ही नावांची उत्पत्ती (पूर्वीच्या) हिंदूस्तानच्या उत्तरेतील सिंधू नदीच्या नावावरून झाली आहे. सिंधूची ग्रीकमध्ये झाली 'इंडस्' आणि फारसी/पर्शियन भाषेत झाली 'हिंदू'. आणि अनुक्रमे 'भारतवर्षा'चा झाला 'इंडिया' आणि 'हिंदूस्तान'.

म्हणजे ही दोन्ही नावे स्वातंत्र्यपूर्व काळात दिलेली आणि वापरली जाणारी आहेत. आता जे भारत + पाकिस्तान + बांग्लादेश + श्रीलंका + म्यानमार आहे ते सर्व पूर्वी ब्रिटिशांच्या अंमलाखाली होते. यांपैकी भारत सोडून कुठल्याही देशाने आपले स्वातंत्र्यपूर्व नाव पुढे चालू ठेवलेले नाही. हिंदूस्तानच्या उत्तर-पश्चिमेतील काही प्रांतांपासून (तेव्हा पश्चिम) पाकिस्तान बनला. तर पूर्व बंगालचा झाला पूर्व पाकिस्तान (आणि नंतर बांग्लादेश). सिलोन आणि बर्मा यांनी यथावकाश आपली नावे बदलून अनुक्रमे श्रीलंका व म्यानमार केली. भारत मात्र स्वतःला अजूनही (अधिकृतपणे) 'इंडिया' म्हणतो आणि म्हणवून घेतो. आणि अनेक भारतीय (अनधिकृतरित्या का होईना) त्याला 'हिंदूस्तान'ही म्हणतात.

बॉम्बे ऐवजी मुंबईचा आणि गुवाहाटी ऐवजी गौहत्तीचा आग्रह  धरणारे आपण "Proud to be a Bhaarateeya" कधी होणार?

६३व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद! ... का जय भारत?

१ ऑग, २०१०

जुने ते सोने

काही दिवसांपूर्वी यूट्यूबची मुशाफिरी करता करता मी प्राचीन संस्कृतींबद्दलच्या काही व्हिडिओंपर्यंत येऊन पोहोचले. प्राचीन काळातील संस्कृती, अगदी चिलीपासून चीनपर्यंत, हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातूनही या संस्कृतींची वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती याविषयी मला फारच उत्सुकता आहे. त्यामुळे मी हे व्हिडिओ न पहाणे शक्यच नव्हते.

बहुतेकवेळा आजचे प्रगत मानव स्वतःला पृथ्वीवरील पहिलेवहिले प्रगत मानव मानतात. आपल्यापूर्वी वैज्ञानिक व तांत्रिकदृष्ट्या प्रगती केलेली मानवी संस्कृती जगात होती हे आपण मुळी मान्यच करू इच्छित नाही. हा हट्ट पाश्चात्य देशांमध्ये जास्त आहे. भारतासारख्या देशात आपण महाभारत व रामायणासारख्या ऐतिहासिक गोष्टींमधून प्राचीन प्रगत संस्कृतींबद्दल ऐकत आलो आहोत. आणि या गोष्टी आपल्याला पौराणिक कथा म्हणून नव्हे तर इतिहास म्हणून सांगितल्या जातात. यूट्यूबवरील या व्हिडिओंमध्येही अशीच प्राचीन संस्कृतींच्या वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीची अनेक उदाहरणे दाखविली आहेत. त्यापैकी डिस्कव्हरी चॅनलने तयार केलेल्या Lost treasures of ancient world (लॉस्ट ट्रेजर्स ऑफ एन्शंट वर्ल्ड = प्राचीन जगतातील हरवलेले खजिने) या मालिकेतील भारताविषयीचा भाग यूट्यूबवर 5 व्हिडिओमध्ये विभागून दाखवलेला आहे. मी त्यातील पहिला भाग इथे समाविष्ट करत आहे. इतर भाग आपण यूट्यूबवर पहाल अशी अपेक्षा.

डिस्कव्हरीने तयार केलेल्या या कार्यक्रमात प्राचीन भारताचा सामाजिक व राजकीय इतिहास आणि त्याचा भारतातील वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीवर झालेला परिणाम यांचा बारकाईने आढावा घेतलेला आहे. सुंदर अ‍ॅनिमेशन्सच्या सहाय्याने त्यात पुरातन मोहें-जो-दारो शहर पुन्हा जिवंत केले आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीची माहिती असलेल्या किंवा नसलेल्या कोणीही पहावा असाच हा कार्यक्रम आहे. मात्र एक गोष्ट मला खटकली ती म्हणजे निवेदकाचे भारतीय शब्दांचे उच्चार! कोणाही पाश्चात्य व्यक्तीकडून शुद्ध भारतीय उच्चारांची अपेक्षा नाही. परंतू या निवेदकाचे उच्चार ऐकणे हा कुठ्ल्याही भारतीयावर अत्याचारच होइल. तेव्हा जरा मन घट्ट करा पण हे व्हिडिओ पहा जरूर.